loader image

या उपचार पद्धतीमध्ये वरील १२ पैकी ३ स्टेप्स खात्रीपूर्वक पार पडल्या जातात. (Refer this) आधी सर्व तपासण्या करून गर्भधारणेत अडथळा आणू शकतील अशा प्रत्येक आजाराला योग्य उपचार सुरु केले जातात.स्त्रीबीज तयार होण्यासाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे पाच दिवस गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांमुळे स्त्रीबीज तयार होऊन पाळीच्या चौदाव्या दिवसाच्या आसपास फुटले तर पाळीच्या प्रोजेस्टेरॉन या होर्मोन ची रक्तातील पातळी वाढत जाऊन एकविसाव्या दिवशी एक ठराविक आकडा पार करून जाते. प्रत्येक पाळीच्या एकविसाव्या दिवशी रक्ताची ही तपासणी केली जाते. हा रिपोर्ट प्रत्येक महिन्यात फोन वर आम्हाला कळवण्यास सांगितले जाते. रक्तातील प्रोजेस्टेरॉनची पातळी अपेक्षेपेक्षा कमी आली तर स्त्रीबीज तयार होण्यासाठी दिलेल्या गोळ्यांचे डोसेस वाढवून द्यावे लागतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होते आहे याची खात्री करून घेतली जाते. प्रत्येक आठवड्यात किमान तीन वेळा शरीर संबंध येत असतील तर स्त्री जनन इंद्रीयामध्ये पुरुष बीजे कायम स्त्रीबिजाची वाट पाहत थांबलेले असतात. त्यामुळे महिन्यात कधीही बाहेर पडून २४ तासात नष्ट होणारे स्त्रीबीज आणि पुरुषबीजांची चुकामुक होण्याची शक्यता अतिशय कमी होते. तसेच पुरुषबीजांना गर्भाशयाच्या तोंडाचा अडथळा पार करून गर्भाशयात शिरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. त्यासाठी शरीर संबंधांआधी कुल्ल्यांखाली जाड उशी घ्यावी आणि संबंधा नंतर ती उशी तशीच ठेऊन पुढे दोन तास झोपून राहावे लागते.

असिस्टेड नॅचरल कनसेप्शनने चार ते सहा महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न केला जातो. प्रत्येक महिन्यात गर्भधारणेचा दर साधारण २०% असतो. चार ते सहा महिन्यात साधारण ५०% स्त्रियांना प्रेग्नन्सी राहते. असिस्टेड नॅचरल कनसेप्शनने चार ते सहा महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न करुनही गर्भ राहिला नाही तर असिस्टेड नॅचरल कनसेप्शनने प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूपच कमी होते. म्हणून पुढील उपचार पद्धतीकडे वळावे लागते.

या उपचार पद्धती मध्ये प्रेग्नन्सी राहण्याच्या १२ स्टेप्स पैकी ६ स्टेप्स खात्रीशीर रित्या पार पडल्या जातात. Intrauterine म्हणजे गर्भाशयात. Insemination म्हणजे हेल्दी पुरुषबीजे सोडणे. गर्भाशयात हेल्दी पुरुषबीजे सोडणे म्हणजे IUI. पण गर्भाशयात हेल्दी पुरुषबीजे कधी सोडायचे? तर स्त्रीबीज फुटून बाहेर पडले असेल त्या दिवशी आणि त्या वेळी गर्भाशयात हेल्दी पुरुषबीजे सोडायची असतात. स्त्रीबीज तयार होण्यासाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे पाच दिवस गोळ्या दिल्या जातात. आठव्या दिवसापासून पुढे स्त्रीबिजाची आणि गर्भाशयाच्या अस्ताराची वाढ सोनोग्राफीने रोज मोजली जाते. स्त्रीबीज पक्व होत आहे म्हणजे स्त्रीबीज असलेल्या follicle चा आकार १८ ते २० मिलीमीटर पर्यंत गेला की स्त्रीबीज पूर्ण पक्व होऊन फुटण्यासाठी ट्रिगरचे एक इंजेक्शन दिले जाते. याच वेळी गर्भाशयाच्या अस्ताराची जाडी ७-९ मिलीमीटर पर्यंत वाढणे अपेक्षित असते. हे इंजेक्शन देण्याचे दोन उद्देश्य असतात. इंजेक्शन नंतर स्त्रीबीज फुटणार हे नक्की असते तसेच ते इंजेक्शन नंतर साधारण ३६ तासांनी फुटते. म्हणजे आपल्याला आता स्त्रीबीज फुटून बाहेत पडण्याची वेळ सुद्धा माहित असते. या वेळेला वीर्यावर प्रक्रिया करून त्यातील केवळ हेल्दी पुरुषबीजे वेगळी केली जातात आणि छोट्या नळीने गर्भाशयाच्या तोंडाचा अडथळा पार करून गर्भाशयात सोडले जातात. आता गर्भावाहक नळीच्या गर्भाशयाच्या टोकाकडे पुरुषबीजे हजर आहेत आणि गर्भावाहक नळीच्या विरुद्ध बाजूला स्त्रीबीज हजर आहे. गर्भावाहक नळी खुली आहे हे आपण आधीच सुनिश्चित केलेले असते. प्रेग्नन्सी राहिली तर तिला आधार म्हणून काही औषधे पुढे १४ दिवस दिली जातात. IUI केल्यास प्रत्येक महिन्यात प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता 20% असते. असिस्टेड नॅचरल कनसेप्शन (Assisted Natural Conception) ने प्रयत्न करताना चार ते सहा महिन्यात साधारण ५०% स्त्रियांना प्रेग्नन्सी राहते. पुढे IUI ने दोन ते चार महिने प्रयत्न केल्यावर आणखी ३०% लोकांना प्रेग्नन्सी राहते. उरलेल्या २०% लोकांना IVF या पुढील उपचार पद्धतीची मदत घ्यावी लागते.

एक स्रीबीज आणि एक पुरूषबीज एकत्र येऊन गर्भ तयार होण्याच्या प्रक्रियेला फर्टिलायझेशन (Fertilization) असे म्हणतात. एरवी ही प्रक्रिया स्रिच्या शरीराच्या आत गर्भवाहक नळीत होते. शरीराच्या आत होणाऱ्या अशा नैसर्गिक फर्टिलायझेनला ‘इन व्हिवो फर्टिलायझेशन’ (In Vivo Fertilization) असे म्हणतात. पण काही कारणांमुळे काही स्रियांच्या शरीरामध्ये असे नैसर्गिक इन व्हिवो फर्टिलायझेशन घडून येत नसल्याने आम्हाला ते शरीराबाहेर घडवून आणून गर्भ तयार करावे लागतात. शरीराबाहेर IVF लॅब मध्ये केल्या जाणाऱ्या अशा फर्टिलायझेशनला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (In Vitro Fertilization) किंवा थोडक्यात IVF असे म्हटले जाते.

IVF मध्ये गर्भ तयार करून ते IVF लॅबमध्ये incubator मध्ये अतिशय सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात जास्तीत जास्त सहा दिवसांपर्यंत वाढवले जातात. सहाव्या दिवशी गर्भांभोवती असलेले कवच फोडून गर्भ बाहेर पडतो आणि गर्भाशयाच्या अस्तरामध्ये मुळ धरून पुढे वाढू लागतो. सहाव्या दिवसाचे दोन गर्भ इंप्लांटेशन विंडोच्या दिवशी गर्भाशयाच्या अस्तरात सोडले तर जास्तीत जास्त ४०% वेळा गर्भधारणा होते. संपुर्ण जगात IVF मध्ये एका महिन्यात यापेक्षा जास्त चांगला गर्भधारणा कुठेही आढळत नाही. दोन वेगवेगळ्या महिन्यात २-२ गर्भ गर्भाशयात सोडले तर प्रेग्नन्सीची एकुण शक्यता ६०% होते. तीन वेळा गर्भ गर्भाशयात सोडले तर ८०% जोडप्यांमध्ये गर्भधारणा होते. अशा प्रकारे सहाव्या दिवसाचे जितके जास्त गर्भ तयार होतील तितक्या जास्त वेळा गर्भांची जोडी गर्भाशयात सोडता येते. प्रेग्नन्सीची शक्यता तितकीच वाढत जाते. अशा प्रकारे IVF मध्ये जितके जास्त गर्भ तयार होतील तितकी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त असते. जितके जास्त गर्भ हवेत तितके जास्त बीजे हातात हवीत.

पुरूष बीजे कोट्यावधींच्या संख्येने तयार होतात. तसेच ते शरीराबाहेर टाकले जात असल्याने त्यांच्या उपलब्धतेचाही प्रश्न नसतो. स्रीबीज मात्र एका महिन्यात एकच तयार होते. ते सुद्धा ओटीपोटातील असणाऱ्या बीजांडात तयार होतात आणि पक्व झाल्यावर फुटून पोटातच बाहेर पडते. त्यामुळे ते सहज उपलब्धही नसते. या सर्वांचा विचार करून IVF मध्ये खालील 10 स्टेप्स मध्ये पार पडते.

a) एकाच वेळी अनेक स्त्रीबीजांची नियंत्रित वाढ (Controlled Ovarian Hyperstimulation) –
पाळीच्या दुसऱ्या दिवशी पेशंटच्या अनेक वैद्यकिय निकषांचा आढावा घेतला जातो. पाळीच्या तिसऱ्या दिवसा पासून पुढे दहा दिवस स्त्रीबीजांची वाढ करणारे फॉलिकल स्टिम्युलेटींग हॉर्मोन (FSH)या हॉर्मोन्सचे इंजेक्शन दिली जातात. अनेक निकष FSH या इंजेक्शन्सचा सुरक्षित डोस ठरवतात. पेशंटचे वय, वजन, अँटीम्युलेरिअन हॉर्मोनची पातळी (AMH level),त्या महिन्यात स्त्रीबीजांडामध्ये वाढ व्हायला सुरूवात झालेल्या स्रीबीजांची संख्या (Antral Follicle Count)असे पेशंटचे अनेक निकष पेशटच्या बीजांडाची FSH ला असलेली संवेदनाशीलता ठरवते. हा डोस कमी पडला तर बीजांची वाढ निट होत नाही. FSH चा डोस जास्त झाला तर त्याचा स्रिच्या शरीरावर ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम (OHSS Ovarian Hyperstimulation syndrome) नावाचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे FSH चा डोस अगदी काळजीपुर्वक ठरवावा लागतो. हे दहा दिवस सोनोग्राफीने स्त्रीबिजांमधील वाढीवर देखरेख ठेवावी लागते. IVF यशस्वी होण्याची शक्यता चांगली राहण्यासाठी साधारण पंधरा स्त्रीबीजे तयार होणे अपेक्षित असते. सुरवातीच्या काळात अगोनिस्ट प्रोटोकॉल वापरला जात असताना डॉक्टरांना थोडेफार OHSS पहायला मिळत. सध्या आम्ही वापरत असलेल्या अँटागोनिस्ट प्रोटोकॉलमध्ये आम्हाला OHSS फारसे कधी पहायला मिळत नाही.

b) स्त्रीबीजे पक्व होऊन फूटण्यासाठी इंजेक्शन ( Trigger Injection) – स्त्रीबीजे पक्व होत आले की फुटण्यासाठी HCG आणि / किंवा GARH agonist या हॉर्मोनचे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शन पासून पुढे ३६ तासांनी बीजे फुटून पोटात बाहेर पडायला सुरूवात होणार असते. त्याआधीच बीजे बाहेर काढणे आवश्यक असते. स्त्री बीजे बाहेर काढायचे ऑपरेशन सकाळच्या वेळी केले जाते.

c) स्रीबीजे फुटून बाहेर पडण्याआधी त्यांना बाहेर काढणे (Ovum Pick Up) –
शरीराबाहेर गर्भ तयार करण्यासाठी स्त्रीबीजे हाताशी हवेत. ट्रिगर इंजेक्शन नंतर बीजे फुटून बाहेर पडायच्या एक तास आधी म्हणजे ३५ तासांनी स्त्रीबीजे शरीराबाहेर काढण्याची छोटे ऑपरेशन केले जाते. भुल देऊन एक सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली एक लांबलचक पातळ सुई बीजांडात टाकली जाते आणि सर्व स्रीबीजे त्याभोवतीच्या पाण्या (follicular fluid) सह सक्शन पंपने शोषून बाहेर काढले जातात.
हे पाणी IVF लॅब मध्ये स्टेरिओझुम सुक्ष्मदर्शकाखाली तपासले जाते आणि त्यातून स्त्रीबीजे वेगळी केली जातात.

या स्त्रीबीजांभोवती संरक्षक पेशींची चळत असते. या पेशींना क्युम्युलस असे म्हणतात. म्हणून या टप्प्यावर स्त्रीबीजांना क्युम्युलस उफोरस काँप्लेक्स ( Cumulus Oophorus Complex) असे म्हणतात.

हे ऑपरेशन अगदीच छोटे असते आणि साधारण १५ मिनिटात संपते. ऑपरेशन दरम्यान पुर्ण भुल दिलेली असल्याने त्या काळात दुखण्याचा अजिबात संभव नसतो. ऑपरेशनमध्ये शरीरावर कुठेही चीरा-टाका नसल्याने ऑपरेशन नंतरही फारसे दुखत नाही. ऑपरेशन नंतर चार तासात भुल पुर्ण उतरते. लगेच डिसचार्ज दिला जातो आणि पेशंट छान चालत घरी जातात.

ICSI या पद्धतीने गर्भ तयार करायचा असेल तर क्युम्युलस उफोरस काँप्लेक्स (Cumulus Oophorus Complex) मधील संरक्षक क्युम्युलस पेशींना हटवून केवळ उफोरस म्हणजे स्रीबीज वेगळे करावे लागते. असे करण्याच्या प्रक्रियेला डिन्युडेशन असे म्हटले जाते. IVF मध्ये ही प्रक्रीया नैसर्गिकरित्याही होत असते. पुरुषबीजे स्रीबीजापर्यंत पोहचले की त्यांच्यामधून एक डायजेस्टिव्ह एंझाइम (Hyaluronidase) बाहेर पडते. हे एंझाइम संरक्षक क्युम्युलस पेशींना स्रीबीजापासून वेगळे करते. IVF लॅबमध्ये कृत्रिमरित्या हे काम करताना करताना याच एंझाइमचा वापर केला जातो.
स्रीबीजाभोवतीच्या संरक्षक क्युम्युलस पेशी हटल्या की स्त्रीबीज व्यवस्थित दिसू लागते. त्याचे दोन फायदे होतात.

१) स्रीबीज व्यवस्थित दिसू लागल्याने स्त्रीबींजांची वर्गवारी करता येते. पक्वतेच्या  वेगवेगळ्या टप्प्यावर असलेली तीन प्रकारची स्रीबीजे सापडतात. पक्व होण्यास सुरवात  झालेल्या स्त्रीबीजाला GV (Germinal Vesicle) असे म्हणतात. अर्धवट पक्व  झालेल्या स्रीबीजाला M1 असे म्हणतात. पुर्ण पक्व झालेल्या स्रीबीजाला M2 असे म्हणतात. यापैकी केवळ M2 फलित होऊ शकतात.

२) स्रीबीजाला ICSI दरम्यान सुरक्षित ठेवता येते. ICSI करताना स्रीबीजामध्ये नेमक्या  जागी पुरुषबीज टोचणे आवश्यक असते. स्त्रीबीज व्यवस्थित दिसत असेल तरच ती नेमकी  जागा कळू शकते. स्रीबीजाला चुकीच्या जागी टोचले गेले तर गर्भात दोष उत्पन्न होतात.

d) फर्टिलायझेशन (IVF किंवा ICSI) –
दोन्ही प्रकारची बीजे हाताशी आले की IVF लॅबमध्ये एक स्त्रीबीज आणि एक पुरूषबीज  एकत्र आणून गर्भ तयार करायची प्रक्रिया सुरू होते. दोन प्रकारे गर्भ तयार करता येतो. 

IVF – फर्टिलायझेशनच्या या पारंपारिक प्रकारात एक स्रीबीज एक लाख पुरूषबीजांसोबत इनक्युबेशन चेंबर मध्ये अतिशय नियंत्रित वातावरणात ६-८ तास सोडले जातात. स्त्रीबीजाभोवती त्याला संरक्षण आणि पोषण देणाऱ्या पेशींचे अनेक थर असतात. पुरुषबीजांनी सोडलेल्या काही हालुरोनिडेज या रसायनामुळे (Enzyme मुळे) हे थर विरघळवले जातात. स्रीबिजाचा काही भाग उघडा पडला की एक पुरूषबीज स्त्रीबिजाभोवतीचे शेवटचे संरक्षक कवच फोडून आत प्रवेश करतो आणि गर्भ तयार होतो. फर्टिलायझेशनच्या या घटनेने स्त्रीबीजाकडून बाहेर टाकलेल्या रसायनांमुळे स्त्रीबीजाचे संरक्षक कवच अतिशय कठिण होते. अशा प्रकारे पुढील पुरूषबीजांना स्त्रीबीजात प्रवेश नाकारला जातो.

ICSI – फर्टिलाझेशनच्या या प्रकारात सुक्ष्मदर्शकाखाली हायड्रॉलिक मायक्रोमॅन्युप्युलेटर(Hydrolic Micromanupulator) च्या मदतीने एका हेल्दी स्रीबीजामध्ये एक हेल्दी पुरूषबीज अतिशय पातळ सुईने टोचले जाते. या प्रक्रियेत स्रीबीज नीट दिसावे आणि पकडता यावे यासाठी सर्वात आधी स्त्रीबीजावरील संरक्षक पेशींचे थर हाटवले जातात. या प्रक्रियेला ‘डिन्युडेशन’ असे म्हटले जाते. अशा प्रकारे तयार केलेले गर्भ नैसर्गिक गर्भाप्रमाणेच वाढतात. तांत्रिकदृष्ट्या हे काम अतिशय किचकट असते. त्यासाठी या कामातील तज्ञ भ्रुणतज्ञांची (Embtyologist ची) मदत घेतली जाते.

e) गर्भाची IVF लॅब मध्ये incubator मध्ये सहा दिवस वाढ (Embryo Culture) –
योग्य वातावरण आणि पोषण मिळाले तर गर्भ पाच दिवस वाढतो. फर्टिलायझेशनला पाच दिवस किंवा 120 तास पुर्ण झाल्यावर गर्भाभोवतीचे कवच (Zona Pellucida ) फोडून गर्भ बाहेर पडतो आणि त्या वेळी उपलब्ध असलेल्या भुमीमध्ये मुळ धरतो. नैसर्गिक फर्टिलायझेशन गर्भवाहक नळीमध्ये होते आणि पुढील पाच दिवसात गर्भ गर्भाशयात पोहचलेला असतो. सुरूवातीच्या काळात दोन्ही बिजे किंवा त्यांच्यापासून गर्भ तयार करून ते लगेच गर्भवाहक नळीत सोडायचा प्रघात होता. या प्रक्रियेला मोठ्या समस्या उत्पन्न होत असत.

IVF / ICSI साठी १५ स्त्रीबीजे मिळाली म्हणजे सहाव्या दिवशी १५ गर्भ तयार होत नाहीत. जे गर्भ हेल्दी असतील तेच प्रत्येक दिवशी निसर्गाने उभे केलेले अडथळे पार करत पाच दिवसांची वाढ पुर्ण करतात. सहाव्या दिवशी कुणाकुणात केवळ दोन गर्भ तयार होतात तर कुणाकुणामध्ये आठ-दहा गर्भही तयार होतात. स्रीबीजे आणि पुरूषबीजांच्या गुणवत्तेनुसार सहाव्या दिवशी किती गर्भ तयार झालेले असतील ते ठरते. समजा एखाद्या स्रीमध्ये पाच- सहा गर्भ तयार झाले तर पाच-सहा गर्भ मुळ धरत. पण स्त्रीचे शरीराची रचना केवळ एक गर्भ वाढण्याच्या दृष्टीने तयार झालेली असते. फार फार तर दोन गर्भ कसेबसे वाढू शकतात आणि त्यातही अनेक वैद्यकीय गुंतागुंती निर्माण होतात. त्यापेक्षा जास्त गर्भांनी एकाच वेळी मुळ धरले तर या गुंतागुंतीचे प्रमाण आणखी वाढत जाते. सर्वात मोठा धोका वेळेआधी प्रसुती होऊन अपक्व बाळ दगावण्याचा असतो. रक्त कमी पडून वा रक्तदाब वाढून आईच्या जीवालाही कधीकधी धोका होऊ शकतो. त्यामुळे अनेक गर्भांना वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यातच गर्भवाहक नळीत वा गर्भाशयात सोडणे शहाणपणाचे ठरत नव्हते.

यावर तोडगा काढण्यासाठी शास्त्रज्ञ झटत होते. गर्भवाहक नळीतील आणि गर्भाशयातील गर्भाच्या वाढीच्या पहिल्या पाच दिवसाच्या वातावरणाचा शास्त्रज्ञ अभ्यास करू लागले. असा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी शरीराबाहेर IVF लॅब मध्ये कृत्रीमरित्या हुबेहुब तसे वातावरण निर्माण केले. तापमान, पोषकघटक, हवेतील वेगवेगळ्या वायूंचे प्रमाण, PH, osmolarity अशा अनेक गोष्टींची काळजी घेतली गेली. तसेच गर्भाच्या वाढीसाठी
घातक असलेल्या काही रसायनांपासून, खासकरून VOC (Volatile Organic Compound) पासून, गर्भाला वाचवण्याची काळजी घेतली गेली. त्यामुळे जसा नैसर्गिक वातावरणात गर्भ वाढतो तसाच तो लॅबमध्ये वाढू लागला.त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. सुरूवातीच्या काळात शास्त्रज्ञांना शरीराबाहेर केवळ तीन दिवस गर्भ वाढवण्यात यश आले होते. त्यात अनेक समस्या होत्या.

पुर्वी तिसऱ्या दिवसाचे चार गर्भ गर्भाशयात सोडले जात. तिसऱ्या दिवसाचे कुठले गर्भ पाच दिवसांची वाढ पुर्ण करून मुळ धरतील याचा अंदाज तिसऱ्या दिवशी बांधणे कठीण असते. गर्भाशयात सोडलेले चारही गर्भ पाचव्या दिवसांपर्यंतची वाढ पुर्ण करणारे असतील तर एकापेक्षा जास्त गर्भ मुळ धरत. त्यामुळे बाळ आणि आईच्या जीवाला धोका उत्पन्न होई. गर्भाशयात सोडलेल्या गर्भांपैकी कुठलाही गर्भ पाच दिवसांची वाढ पुर्ण करू शकणारा नसेल तर एकही गर्भ मुळ धरत नसे. इतकी धडपड करून पदरी अपयश पडाले तर ते जोडपे अतिशय निराश होई.

अतिशय महागडी प्रक्रिया करून IVF/ICSI मध्ये चार-पाच पेक्षा जास्त तयार झालेल्या हेल्दी गर्भांचे काय करायचे हा सुद्धा मोठा प्रश्न डॉक्टरांसमोर असे. तसेच गार्भाच्या वाढीचे पाच दिवस पुर्ण झाल्याच्या वेळी गर्भाशयाचे अस्तर गरजेपेक्षा कमी वा अधिक विकसित झालेले असेल तर मोठा प्रश्न निर्माण होई. अशा वेळी इंप्लान्टेशन विंडोचे २४ तास आणि गर्भाचा सहावा दिवस एकच वेळी येत नसल्याने गर्भधारणा होत नसे.

पुढे शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून तिसऱ्या दिवसापासून पाचव्या दिवसाच्या शेवटपर्यंत गर्भाची वाढ शरीराबाहेर करायचे तंत्रज्ञान शोधून काढले. पाच दिवस पुर्ण वाढ झालेले दोन गर्भ गर्भाशयात सोडले तर बहुतेक वेळा एकच गर्भ राही.अगदी क्वचीत दोन गर्भ मुळधरून जुळे होई. अशा प्रकारे बाळ आणि आईच्या जीवाचा धोका कमी झाला. तरी उरलेल्या गर्भांचे काय करायचे हा प्रश्न डॉक्टरांना भेडसावत होताच.इंप्लांटेशन विंडो चुकण्याचा धोकाही कायम असे. तसे झाले तर गर्भधारणा शक्य होत नसे.

f) तिसऱ्या किंवा सहाव्या दिवशी गर्भ गोठवून ठेवणे (Freezing of Embryo) –

एका महिन्यात दोनापेक्षा जास्त पाचव्या दिवसाचे गर्भ गर्भाशयात सोडून काहीही उपयोग नसतो. आधी IVF मध्ये दोन पेक्षा जास्त गर्भ तयार झाले तर त्यांचे काय करायचे याचा प्रश्न पडे. केलेल्या खर्चाच्या मानाने प्रत्येक गर्भ अतिशय मौल्यवान ठरे. ते टाकून देणे जीवावर येई. तसेच गर्भ तयार होईल त्या वेळी गर्भाशयाचे अस्तर नसेल तर गर्भधारणा होत नसे. म्हणून गर्भांचा नंतर वापर करण्यासाठी फ्रिज करून ठेवता येईल का याबाबत शास्त्रज्ञ प्रयत्न करू लागते. द्रवरूप नायट्रोजनमध्ये पेशींचे तापमान उणे १९६ डिग्री पर्यंत जात असे आणि द्रवरूप नायट्रोजनमुळे पेशींना इजा होत नसे. पण कुठलीही मानवी पेशी फ्रिझिंग तापमानापर्यंत नेली की त्या पेशीतील पाणी गोठून त्याचे टोकदार स्फटिक तयार होत. हे टोकदार स्फटिक पेशीच्या वेगवेगळ्या अवयवांना इजा करत. अशी पेशी परत ३७ डिग्री तापमान पर्यंत आणली तरी ती बर्फाच्या टोकदार स्फटिकांमुळे झालेल्या इजेमुळे मृत झालेली असे. शास्त्रज्ञाना हे माहित होते की बर्फाळ प्रदेशातील काही जीव गोठण बिंदू खालील पमानातही जिवंत राहतात. त्यांचा अभ्यास केल्यावर असे समजले की ते जीव तापमान गोठणबिंदूखाली जाण्याआधी पेशींमधील पाणी बाहेर टाकतात आणिपेशीत अगदी कमी तापमानालाही न गोठणारे रसायन (Cryoprotectant) निर्माण करतात.तोच प्रकार मानवी गर्भातील पेशींसोबत केला गेला. त्यात १९८४ साली प्रथमच यश मिळाले. गर्भाच्या पेशींमधील पाणी बाहेर काढून क्रायोप्रोटेक्टंट पेशीत भरले गेले. मग तो गर्भ द्रवरूप नायट्रोजनमध्ये उणे १९६ डिग्री सेल्सिअस तापमानाला गोठवला गेला. काही महीन्यानंतर तो गर्भ पुन्हा ३७ डिग्रीला आणला गेला. त्यातील पेशींमधील क्रायोप्रोटेक्टंट बाहेर काढून पाणी आत सोडले गेले आणि गर्भ परत वाढू लागला. फ्रिझिंगचे तीन प्रमुख फायदे मिळू लागले.

१) दोन पेक्षा जास्त गर्भ तयार झाले तर ते हवे तो पर्यंत साठवून ठेवता येऊ लागले. आधी एका IVF मध्ये फक्त दोनच गर्भ गर्भाशयात सोडणे शहाणपणाचे असल्याने IVF च्या एकंदरीत यशाचा दर जास्तीत जास्त ४०% होता. पण आता फ्रिजिंगच्या तंत्रज्ञानामुळेत्यामुळे प्रत्येक वेळी IVF ची पुर्ण खर्चिक प्रक्रिया परत न करता केवळ गर्भाशयचे अस्तर तयार करून गोठवलेले गर्भ पूर्वस्थितीत आणून गर्भाशय सोडणे शक्य होते. प्रत्येक वेळी दोन गर्भ गर्भाशयात सोडले की गर्भ राहण्याची शक्यता ४०% असते. दोन वेळा असे केले तर एकुण ६०% प्रेग्नन्सी राहते. असे तीन वेळा करता आले तर ८०% वेळा त्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहते. वारंवारतेचा हा खेळ फ्रिजिंगमुळे वारंवार खेळता आल्याने प्रेग्नन्सीचा एकुण दर वाढला. त्यामुळे एका IVF चा एकंदरीत प्रेग्नन्सीचा दर वाढला.

२) गर्भाशयाचे अस्तर वाढून गर्भधारणेची सर्वोत्तम शक्यता असलेला इंप्लांटेशन विंडोचा दिवस आणि गर्भाच्या वाढीचा सहावा दिवस एकच येणे आवश्यक असते. गर्भाशयाच्या अस्तराची वाढ कमी अधिक वेगात झाल्यास हे दोन्ही दिवस एकाच वेळी येणे शक्य होत नाही. पण गर्भाच्या फ्रिझिंग तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले. गर्भ गोठवून परत नॉर्मलला आणला की ज्या स्टेजला गर्भ गोठवला होता त्याच स्टेजपासून त्याची पुढे वाढ चालू होते. त्यामुळे हे दोन्ही दिवस एकाच वेळी आणणे शक्य झाले. त्यामुळे प्रेग्नन्सीची शक्यता आणखी वाढली.

३) आश्चर्य म्हणजे फ्रिझिंगचा ताण सहन करून जगलेले गर्भ गर्भाशयात सोडले असता प्रत्येक महिन्यातील प्रेग्नन्सीचा दर इतर वेळी पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

g) स्रिच्या गर्भाशयचे आतील अस्तर गर्भधारणेसाठी तयार करणे (Endometrial preparation) – जसा शेतकरी बी पेरणीआधी जमीन नांगरून आणि खते घालून तयार करतो तसेच गर्भाचे बीज जमीनीत म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरात पेरण्याआधी निसर्ग ती जमीन सुपीक करतो. कांद्यावरील परतींप्रमाणे स्त्रीबीजाभोवती पेशींच्या संरक्षक परती असतात. त्यांचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात

१) आतली परत – ग्रान्युलोजा पेशीची परत

२) बाहेरची परत – थिका पेशींची परत

बीज तयार व्हायच्या प्रक्रियेत स्रीबीजाच्या आजुबाजुच्या या पेशींमधून अनेक हॉर्मोन्स तयार होतात. त्यांचा मुख्य उद्देश गर्भधारणेसाठी जमीन तयार करणे हा असतो. मेंदूच्या खालच्या भागाला जोडलेल्या पिच्युटरी या ग्रंथीतून FSH आणि LH हे दोन हॉर्मोन तयार होत असतात. FSH मुळे ग्रान्युलोजा पेशींमधून इस्ट्रोजेन (Estrogen) हे हॉर्मोन तयार होते. ते गर्भधारणेची जमीन सुपीक करण्याचे काम करते. म्हणजे त्यामुळे गर्भाशयाचे अस्तराची जाडी वाढते. तसेच गर्भाशयाच्या अस्तराचे सिंचन म्हणजे रक्तपुरवठा वाढत जातो. LH मुळे थिका पेशींमधून अँड्रोजन नावाचे हॉर्मोन तयार होते. ते जमीन नापीक करण्याचे काम करते. हे अँड्रोजन ताणाचे नियोजन करणारे स्ट्रेस हॉर्मोन आहे. म्हणजे मनावर ताण आला की त्याच्यावर मात करण्यासाठी मनाची शक्ती वाढवण्यासाठी बीजांडातून या हॉर्मोनची जास्त निर्मिती होऊ लागते. त्यातून मन खंबीर होते पण गर्भाशयाचे अस्तर मात्र बंजर होत जाते. तसेच याच अँड्रोजनमुळे स्रीबीज तयार होण्याची प्रक्रियाही मंदावते. अशा प्रकारे आधीच ताणात असलेल्या आपल्या लेकराला प्रेग्नन्सीच्या अतिरिक्त ताणापासून वाचवण्याचा प्रयत्न प्रकृतीमाता करत असल्याचे दिसते.

फुटण्याआधी (Before ovulation)
FSH —> Granulosa Cells —> Oestrogen
LH —-> Theca Cells —-> Androgen

स्त्रीबीज पक्व होऊन फुटेपर्यंत केवळ इस्ट्रोजन हॉर्मोन तयार होऊन गर्भाशयाच्या  अस्तराची वाढ होत जाते. स्रीबीज फुटल्यानंतर ग्रान्युलोजा पेशींपासून फक्त इस्ट्रोजन ऐवजी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन अशी दोन हॉर्मोन्स बाहेर पडतात. स्त्रीबीज फुटल्या नंतर (After ovulation )

FSH —> Grannulosa Cells—> Estrogen + Progesterone
LH —-> Thica Cells—-> Androgen

स्रीबीज बाहेर पडलेल्या दिवशी गर्भ तयार होतो. गर्भ तयार झाल्याच्या क्षणापासून पाच दिवसांनंतर म्हणजे १२० तासांनी गर्भ भोवतीचे कवच फोडून गर्भाशयाच्या अस्तरात मुळ धरतो. या पाच दिवसात प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अस्तरात महत्वाचे बदल घडवतो. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाने येथील पेशींमध्ये साधारण ४८ वेगवेगळे जनुके पुर्ण क्षमतेने काम करू लागतात. प्रत्येक जनुक एक प्रथिन (Protein) तयार करते आणि ते प्रथिन गर्भधारणेसाठी 

महत्वाचे असे एक काम पार पाडते. स्रीबीज फुटून बाहेर पडल्या पासून १२० ते १३४ तासांदरम्यान हे जनुके सर्वात जास्त कार्यक्षम झालेले असल्याने या काळात गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. या काळालाच इंप्लांटेशन विंडो असे म्हणतात. अगदी थोड्या स्त्रियांमध्ये ही इंप्लांटेशन विंडो १९२० तासांच्या आधी वा १३४ तासांच्या नंतरही येऊ शकते. म्हणून IVF मध्ये वारंवार अपयश येत असेल तर गर्भाशयाच्या अस्तराची ERA (Endometrial Receptivity Array) ही जनुकीय तपासणी करून इंप्लांटेशन विंडो नक्की कधी येते ते तपासले जाते. ही तपासणी थोडी महागडी असली तरी गर्भ वारंवार मुळ धरत नसेल तर ही तपासणी करून घेतलेली शहाणपणाचे ठरते.

अशा प्रकारे गर्भाशयाचे अस्तर तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत

१) सेम सायकल ट्रान्सफर (Same Cycle transfer) । —> या पद्धतीमध्ये गर्भ गोठवले जात नाहीत. त्यामुळे या पद्धतीला फ्रेश एंब्रिओ ट्रांस्फर (Fresh Embryo transfer) असेही म्हटले जाते. IVF मध्ये स्त्रीबीजे वाढत असताना तयार होणाऱ्या इस्ट्रोजन हॉर्मोनमुळे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ होते. Ovum-pick up आणि ICSI नंतर गर्भ लॅब मध्ये वाढत असताना HCG injection च्या ट्रिगरमुळे बीजांडातून इस्ट्रोजनसोबत प्रोजेस्टेरॉनही तयार होते. गर्भाच्या वाढीच्यसहाव्या दिवशी पर्यंत गर्भाशयाच्या अस्ताराची इंप्लांटेशन विंडो सहाव्या दिवशी येते. 

2) फ्रोझन एंब्रिओ ट्रान्सफर (Frozen Embryo Transfer). —>
गर्भाचा सहावा दिवस आणि गर्भाशयाच्या अस्तराची इंप्लांटेशन विंडो एकाच दिवशी येण्याची शक्यता नसेल तेव्हा सर्व गर्भ दोन दोनच्या जोड्यांनी द्रवरूप नायट्रोजनखाली उणे १९६ डिग्री सेल्सिअसला गोठून ठेवले जातात. IVF चा घटनाक्रम संपून पेशंटला पाळी येऊ दिली जाते. मग पुढील महिन्यात गर्भाशयाचे अस्तर तयार करून त्याची इंप्लांटेशन विंडो आली की दोन गर्भ गर्भ द्रवरूप नायट्रोजन मधून बाहेर काढून पुर्वस्थितीला आणले जातात आणि ते गर्भ गर्भाशयात सोडले जातात

फ्रोझन एंब्रिओ ट्रान्सफर (Frozen Embryo Transfer) मध्येही गर्भाशयाचे अस्तर तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत

१) नॅचरल सायकल (Natural Cycle) —-> IVF ची प्रक्रिया केल्यानंतर लगेच येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या पाळीपासून ही प्रक्रीया करता येते. या पद्धतीमध्ये IVF नंतर याणा- या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे स्रीबीज तयार करणारी औषधे दिली जातात आणि स्रीबीज तयार होण्याच्या या प्रक्रियेत तयार होणाऱ्या इस्ट्रोजन हॉर्मोनच्या माध्यमातून गर्भाशयाचे अस्तर नैसर्गिक रित्या तयार करवून घेतले जाते. स्त्रीबीज आणि गर्भाशयाचे अस्तराच्या वाढीवर रोज सोनोग्राफी करून लक्ष ठेवले जाते.

२) डाऊनरेग्युलेटेड सायकल (Downregulated Cycle)—> या पद्धतीत नैसर्गिक बीजनिर्मितीची प्रक्रिया डाऊनरेग्युलेशन या तंत्राने तात्पुरती थांबवली जाते आणि गर्भाशयाचे अस्तर तयार करण्याची संपुर्ण प्रक्रिया डॉक्टर स्वतःच्या हातात घेतात. तिसऱ्या किंवा सहाव्या दिवशी गर्भ गोठवले असतील तरच ही पद्धत वापरता येते. IVF ची प्रोसेस झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून डाऊनरेग्युलेशनची प्रक्रिया चालू केली जाते. आधी २१ दिवस गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. पाळीच्या २१ व्या दिवशी GnRH agonist हे एक इंजेक्शन्स दिले जाते. त्यानंतर दर २१ दिवसांनी GnRH agonist चे इंजेक्शन्स रिपीट केले जाते. त्यानंतर येणाऱ्या पाळीच्या (म्हणजे IVF प्रोसेसपासून येणाऱ्या दुसऱ्या पाळीच्या) दुसऱ्या दिवशी परत बोलावले जाते. 

सोनोग्राफी आणि रक्तातील काही हॉर्मोन्सच्या तपासण्या करून डाऊनरेग्युलेशन पुर्णपणे झाले आहे याची खात्री करून घेतली जाते. मग गोळीच्या स्वरूपात इस्ट्रोजन हॉर्मोन चालू केले जाते आणि गर्भाशयाच्या अस्तराची वाढ केली जाते.

वरील दोन्ही प्रकारात सोनोग्राफीच्या मदतीने गर्भाशयाच्या अस्तराची जाडी वारंवार मोजली जाते. अस्तराची जाडी ९ ते १२ मिलीमीटर झाल्यावर रोज एक प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन दिले जाते.. पहिल्या इंजेक्शनची वेळ आणि IVF/ICSI ची वेळ एक धरून पुढील तासांचा हिशोब केला जातो. IVF / ICSI नंतर जितक्या तासांनी गर्भ फ्रिझ केलेले असतील तितक्या तासांपर्यंत पहिल्या इंजेक्शन पासूनची वेळ झाली की गोठवलेले गर्भ पुर्वस्थितीत आणून गर्भाशयात सोडले जातात.

h) गोठवलेले गर्भ पूर्वस्थितीत आणणे (Thawing of frozen embryo) –

IVF / ICSI नंतर शक्यतो तिसऱ्या दिवशी (७२ तास) किंवा सहाव्या दिवशी (१२० तास) गर्भ गोठवून ठेवले जातात. गोठवलेले गर्भ पूर्वस्थितीत आणले की तेथून पुढे त्यांची वाढ सुरू होते. इस्ट्रोजनच्या गोळ्यांनी गर्भाशयाचे अस्तर ९-१२ मिलीमीटर झाल्यावर इस्ट्रोजनच्या गोळ्यांसोबत प्रोजेस्टेरॉनची इंजेक्शन्स चालू केली जातात. पहिल्या इंजेक्शन पासून तास मोजले जातात. तिसऱ्या दिवसाचे गोठवलेले गर्भ गर्भाशयात सोडायचे असल्यास प्रोजेस्टेरॉनच्या पहिल्या इंजेक्शन पासून ७२ तासांनी गर्भ द्रवरूप नायट्रोजन मधून काढून त्यांच्यावर त्यांना पुर्वस्थितीत आणण्याची प्रक्रिया केली जाते. गर्भाच्या प्रत्येक पेशीच्या आत साठवलेले क्रायोप्रोटेक्टंट बाहेर काढून परत तेथे पाणी पाठवण्याची व्यवस्था या प्रक्रियेतून केली जाते. थोडा वेळ गर्भासाठी पोषक असलेल्या कल्चर मेडियामध्ये ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाला इनक्युबेशन चेंबरमध्ये गर्भ ठेवला की तो पुर्णपणे पुर्वस्थितीत येऊन परत वाढू लागतो. ७२ तासांनी फ्रिझ करून ठेवलेला गर्भ पुर्वस्थितीत आणला जातो आणि त्याच वेळी पहिल्या प्रोजेस्टेरॉन इंजेक्शन नंतर बरोबर ७२ तास झालेले असणे अपेक्षित असते. पहिल्या प्रोजेस्टेरॉन इंजेक्शन नंतर १२० तास झाले की १२० तासांना फ्रीझ केलाले गर्भ पुर्वस्थितीत आणून गर्भाशयात सोडले जातात.

i) योग्य वेळी गर्भ गर्भाशयात सोडणे (Embryo Transfer) – गर्भाशयात गर्भ सोडण्याच्या प्रक्रियेला एंब्रिओ ट्रांसफर (Embryo Transfer) असे म्हणतात. दोन प्रकारे गर्भ गर्भाशयात सोडण्यात येतात

१) सेम सायकल ट्रान्सफर (Same Cycle transfer). —> Ovum Pick up आणि IVF / ICSI केलेल्या महिन्यातच गर्भ गर्भाशयात सोडण्यात आले तर त्याला फ्रेश सायकल एंब्रिओ ट्रांसफर (Fresh Cycle Embryo Transfer) असे म्हणतात. या प्रकारात गर्भ तयार झाल्यानंतर त्यांना गोठवून न ठेवता त्याच सायकल मध्ये गर्भाशयात सोडले जातात. या पद्धतीमध्ये गर्भ गोठवले जात नसल्यामुळे या पद्धतीला फ्रेश एंब्रिओ ट्रांस्फर (Fresh Embryo transfer) असेही म्हटले जाते. IVF मध्ये स्त्रीबीजे वाढत असताना तयार होणाऱ्या इस्ट्रोजन हॉर्मोनमुळे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ होते. Ovum-pick up आणि ICSI नंतर गर्भ लॅब मध्ये इनक्युबेटर मध्ये वाढत असताना HCG injection च्या ट्रिगरमुळे बीजांडातून इस्ट्रोजनसोबत प्रोजेस्टेरॉनही तयार होते. गर्भाच्या वाढीच्या सहाव्या दिवशी पर्यंत गर्भाशयाच्या अस्ताराची इंप्लांटेशन विंडो सहाव्या दिवशी येते.

IVF च्या प्रोसेस मध्ये स्रीबीज वाढण्यासाठी दहा दिवस FSH या हॉर्मोनचे इंजेक्शन्स दिली जातात. स्त्रीबीज वाढण्याच्या प्रक्रियेत इस्ट्रोजन हे हॉर्मोन तयार होते. हे इस्ट्रोजन गर्भाशयाच्या अस्तराची नैसर्गिक रित्या वाढ करते. पंधरापेक्षा कमी स्त्रीबीजे तयार झालेली असतील तर गर्भाशयाचे अस्तर आणि गर्भांची वाढ समान वेगाने होते असे निदर्शनात आले आहे. इंप्लाटेशन विंडोचा दिवस आणि गर्भाचा सहावा दिवस एकच येत असल्याने अशा वेळी गर्भधारणेची शक्यता चांगली असते. एखाद्या IVF सायकलमध्ये पंधरापेक्षा जास्त स्त्रीबीजे तयार झाली तर त्यांच्यापासून खुप जास्त इस्ट्रोजन तयार होते आणि गर्भाशयाचे अस्तर लवकर तयार होऊन अस्तराची इंप्लांटेशन विंडो गर्भांच्या सहाव्या दिवसाच्या आधीच येऊन जाते. त्यामुळे अशा सायकल मध्ये फ्रोझन सायकल केल्यास प्रेग्नन्सीची शक्यता चांगली असते.

२) फ्रोझन एंब्रिओ ट्रान्सफर (Frozen Embryo Transfer) —> • गर्भाचा सहावा दिवस आणि गर्भाशयाच्या अस्तराची इंप्लांटेशन विंडो एकाच दिवशी येण्याची शक्यता नसेल तेव्हा सर्व गर्भ दोन दोनच्या जोड्यांनी द्रवरूप नायट्रोजनखाली उणे १९६ डिग्री सेल्सिअसला गोठून ठेवले जातात. IVF चा घटनाक्रम संपून पेशंटला पाळी येऊ दिली जाते. मग पुढील महिन्यात गर्भाशयाचे अस्तर तयार करून त्याची इंप्लांटेशन विंडो आली
की दोन गर्भ गर्भ द्रवरूप नायट्रोजन मधून बाहेर काढून पुर्वस्थितीला आणले जातात आणि ते गर्भ गर्भाशयात सोडले जातात.

फ्रोझन एंब्रिओ ट्रान्सफर (Frozen Embryo Transfer) मध्येही गर्भाशयाचे अस्तर तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत

अ) नॅचरल सायकल (Natural Cycle) — 1 —-> IVF ची प्रक्रिया केल्यानंतर लगेच येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या पाळीपासून ही प्रक्रीया करता येते. या पद्धतीमध्ये IVF नंतर याणा- या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे स्रीबीज तयार करणारी औषधे दिली जातात आणि स्रीबीज तयार होण्याच्या या प्रक्रियेत तयार होणाऱ्या इस्ट्रोजन हॉर्मोनच्या माध्यमातून गर्भाशयाचे अस्तर नैसर्गिक रित्या तयार करवून घेतले जाते. स्रीबीज आणि गर्भाशयाचे अस्तराच्या वाढीवर रोज सोनोग्राफी करून लक्ष ठेवले जाते. स्त्रीबीज आणि अस्तर तयार झाले की ट्रिगरसाठी HCG चे इंजेक्शन दिले जाते. HCG ट्रिगर पासून पुढे ३६ तासां वेळ ही गर्भ तयार झाल्याची वेळ धरली जाते. त्यावेळी प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन दिले जाते आणि दर २४ तासांनी ते परत दिले जाते. असे पुढे 120 तास प्रोजेस्टेरॉनची इंजेक्शने दिली जातात. मग १२० तासांच्या काही काळ आधी गर्भ द्रवरूप नायट्रोजन मधून काढून पुर्वस्थितीला आणले जातात.. प्रोजेस्टेरॉनच्या पहिल्या इंजेक्शन पासून बरोबर १२० तासांनी गर्भ गर्भाशयात सोडला जातो.

ब) डाऊनरेग्युलेटेड सायकल (Downregulated Cycle) —> या पद्धतीत नैसर्गिक बीजनिर्मितीची प्रक्रिया डाऊनरेग्युलेशन या तंत्राने तात्पुरती थांबवली जाते आणि गर्भाशयाचे अस्तर तयार करण्याची संपुर्ण प्रक्रिया डॉक्टर स्वतःच्या हातात घेतात. तिसऱ्या किंवा सहाव्या दिवशी गर्भ गोठवले असतील तरच ही पद्धत वापरता येते. IVF ची प्रोसेस झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून डाऊनरेग्युलेशनची प्रक्रिया चालू केली जाते. आधी २१ दिवस गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. पाळीच्या २१ व्या दिवशी GnRH agonist हे एक इंजेक्शन्स दिले जाते. त्यानंतर दर २१ दिवसांनी GnRH agonist चे इंजेक्शन्स रिपीट केले जाते. त्यानंतर येणाऱ्या पाळीच्या (म्हणजे IVF प्रोसेसपासून येणाऱ्या दुसऱ्या पाळीच्या) दुसऱ्या दिवशी परत बोलावले जाते. सोनोग्राफी आणि रक्तातील काही हॉर्मोन्सच्या तपासण्या करून डाऊनरेग्युलेशन पुर्णपणे झाले आहे याची खात्री करून घेतली जाते. मग गोळीच्या स्वरूपात इस्ट्रोजन हॉर्मोन चालू केले जाते आणि गर्भाशयाच्या अस्तराची वाढ केली जाते. गर्भाशयाच्या अस्तराची जाडी (Endometrial Thickness) आणि गर्भाशयाच्या अस्तराचा रक्तपुरवठा सोनोग्राफी- डॉप्लरने मोजला जातो. गर्भाशयाचे अस्तर ९ मिलीमीटरच्या पुढे पोहचले आणि अस्तराचा रक्तपुरवठा समाधानकारक असेल तर त्यावेळी प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन दिले जाते आणि दर २४ तासांनी ते परत दिले जाते. असे पुढे १२० तास प्रोजेस्टेरॉनची इंजेक्शने दिली जातात. मग १२० तासांच्या काही काळ आधी गर्भ द्रवरूप नायट्रोजन मधून काढून पुर्वस्थितीला आणले जातात. प्रोजेस्टेरॉनच्या पहिल्या इंजेक्शन पासून बरोबर १२० तासांनी गर्भ गर्भाशयात सोडला जातो.

गर्भ गर्भाशयात सोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी असते. गर्भाशयात गर्भ सोडण्याच्या प्रक्रियेत कसलीही वेदना होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया करताना भुल वगैरे द्यावी लागत नाही. योनीमार्गात स्पेक्युलम (speculum) टाकून गर्भाशयाचे तोंड दृष्टीक्षेपात आणला जाते. सोबत पोटावरून सोनोग्राफीच्या मदतीने गर्भाशयकडे पाहिले जात असते. एक पातळ नळी गर्भाशयच्या तोंडातून गर्भाशयाच्या पोकळीपर्यंत टाकली जाते. त्या नळीला एंब्रिओ ट्रांसफर कॅथेटर (Embryo Transfer Catheter) असे म्हणतात. त्याच्या मागील बाजूला एक सिरींज जोडली जाते आणि तिच्या मदतीने पुढील टोकाकडील भागात गर्भ ओढून घेतले जातात.मग नळीचे टोक गर्भाशयाच्या तोंडातून गर्भाशयाच्या पोकळीत सरकवले जाते. मग नळीच्या टोकातील गर्भ सिरींजच्या मदतीने गर्भाशयाच्या पोकळीत ढकलले जातात. या प्रोसेस नंतर गर्भाशयाचे तोंड पुर्ण बंद होईपर्यंत म्हणजे अर्धा ते एक तास तसेच झोपून ठेवले जाते. नंतर पेशंटला औषधे देऊन पथ्य समजावले जातात आणि लगेच घरी सोडले जाते.

गर्भ गर्भाशयात टाकल्यानंतर थोड्या वेळातच गर्भ कवच फोडून बाहेर येतो आणि गर्भाशयाच्या तयार अस्तरात मुळ धरतो.

j) गर्भधारणा होण्यासाठी तसेच टिकण्यासाठी आवश्यक हॉर्मोन्स् आणि इतर औषधांचा आधार पुढा १४ दिवस चालू ठेवणे (Luteal phase support ) —> जसे रोपटे लावल्यावर सुरवातीच्या काळात आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते तसेच गर्भधारणेतील सुरवातीच्या काळात आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. सुरवातीला जसे रोपट्याला रोज पाणी घालले जाते तसेच सुरवातीच्या काळात गर्भालाही रोज हॉर्मोनने सिंचन करावे लागते. प्रेग्नन्सी टेस्ट होऊन प्रेग्नन्सी राहिल्याची खात्री होईपर्यंत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा आधार चालू राहतो. प्रेग्नन्सी राहिल्याची खात्री झाली तर हा आधार तसाच पुढे चालू ठेवावा लागतो. प्रेग्नन्सी राहिली नाही तर मात्र हा आधार बंद केला जातो आणि मग काही दिवसात पाळी येते.

k) प्रेग्नन्सी टेस्ट —-> गर्भाने गर्भाशयाच्या अस्तरात मुळ धरले की गर्भांच्या मुळांमधून ह्युमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपीन (HCG – Human Chorionic Gonadotropin) हे हॉर्मोन तयार होते आणि आईच्या रक्तात मिसळले जाऊ लागते. गर्भधारणा झालेली असेल तर आईच्या रक्तात या हॉर्मोनच्या पातळी वाढत जाते. साधारण चौदा दिवसांनी आईच्या रक्तातील HCG ची पातळी तपासली असता प्रेग्नन्सी राहिली किंवा नाही यावर स्पष्ट निर्वाळा मिळू शकतो.

शरीरातील प्रत्येक अवयवातील कार्यक्षम पेशी वयोमानानुसार हळूहळू नष्ट होत जातात. वयाच्या एका टप्प्यावर कुठल्याही अवयवातील कार्यक्षम पेशींची संख्या इतकी कमी होते की त्या अवयवाचे निसर्गाने शरीरात ठरवून दिलेले काम पुर्ण करणे शक्य होत नाही. या अवस्थेला अवयव निकामी होणे वा ऑरगन फेल्युअर (Organ failure)असे म्हणतात.

प्रत्येक अवयवाचा म्हातारा होण्याचा एक वेग असतो. उदा. किडनी आणि हृदय वयाच्या शंभर वर्षांनंतरही काम करत राहतात.वेगवेगळ्या लोकांमध्ये महत्वाचे अवयव म्हातारे होण्याचा सरासरी वेग वेगवेगळा असतो.त्यानुसार व्यक्तीचे आयुष्यमान ठरते. एकाच अवयवाचा म्हातारा होण्याचा वेग वेगावेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा असतो.काही आजार हा वेग वाढवू शकतात. उदा. मधुमेह आणि उच्चरक्तदाब किडनी तसेच हृदयाचा म्हातारे होण्याचा वेग वाढवू शकतात.

स्त्री वा पुरुष बीजांड हा सुद्धा मानवी शरीराचा एक अवयव आहे. प्रजननासाठी बीजे आणि हॉर्मोन्स तयार करणे हे त्यांचे काम असते. स्त्रीयांमध्ये साधारण ४८ वयाला (+/- ४ वर्षे) स्त्रीबीजांड पुर्ण म्हातारे होऊन स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रीया पुर्णपणे थांबते. पुरूषांमध्ये पुरूषबीजे तयार होण्याची प्रक्रिया ६०-६५ वर्षांपर्यंत चालू राहते. पण बीजांडे म्हातारे होण्याचा वेग व्यक्ती परत्वे बदलतो. काही आजारांमध्ये बीजांडे तरुणपणातच पुर्ण म्हातारे होतात आणि बीजे तयार होण्याची प्रक्रिया पुर्णपणे थांबते. अशा स्त्री-पुरूषांमध्ये वंधत्वची समस्या निर्माण होते.

एकदा म्हाताऱ्या झालेल्या अवयवला परत तरूण करणारे कुठलेही औषध अस्तित्वात नाही. त्यामुळे बिजांडे वेळेआधी फेल झालेल्या स्त्री-पुरुषांना स्वतःच्या बीजांने गर्भ राहणे सध्या तरी शक्य नाही. यावर मात करण्यासाठी दान केलेल्या बीजांची मदत घेतली जाते. ब्लड बँक असते तशाच स्पर्म (पुरूषबीज) बँक आणि ओव्हम (स्त्रीबीज) बँक असतात. पती-पत्नीपैकी ज्यांची बीजे तयार होणे थांबलेले असेल त्यांच्यासाठी या बँकांमधून बीजे घेऊन त्यापासून गर्भ तयार करणे शक्य आणि कायदेशीर आहे. अशा बीजांपासून तयार झालेला गर्भ पत्नीच्या गर्भाशयात वाढवला जातो. अशा प्रकारे एकाद्या जोडप्यात पति किंवा पत्नीचे बीजांड वेळेआधी फेल झाले तरी आता डोनर
बँकांच्या माध्यमातून त्यांना प्रेग्नन्सी देणे शक्य आहे.

सरोगेट (Surrogate) म्हणजे एका व्यक्तीची वा गोष्टीची जागा दुसऱ्या व्यक्तीने वा वस्तूने घेणे. काही जोडप्यांमध्ये बीजे व्यवस्थित तयार होतात पण त्या बीजांपासून तयार होणाऱ्या गर्भाचे रोपटे लावण्यासाठी आवश्यक जमीन (गर्भाशय) अस्तीत्वात नसते वा ती कायमस्वरूपी बंजर झालेली असते. सुदैवाने अशा जोडप्याला मदत करायला तयार असलेल्या दुसऱ्या स्रीच्या गर्भाशयात अशा जोडप्याचा गर्भ वाढू शकतो. अशा प्रकारे दुसऱ्या त्रिच्या गर्भाशयात एखाद्या जोडप्याचा गर्भ वाढवण्याच्या प्रक्रियेला ‘सरोगसी’ असे म्हणतात.

सध्या सरोगरी साठी भारतात कायदा झालेला आहे आणि अगदी ठराविक कारणांसाठीच सरोगसी होऊ शकते.

१) जन्मापासूनच गर्भाशय नसणे वा गर्भाशयात जन्मजात दोष असणे.
२) आजारामुळे गर्भाशय काढून टाकावे लागणे.
३) टिबी सारख्या एखाद्या आजारामध्ये गर्भाशय इतके खराब होते की त्यात गर्भ राहणे वा टिकणे शक्य होत नाही.
४) पत्नीच्या कुठल्यातरी आजारामुळे (उदा- हृदयाच्या झडपा खराब होणे) तिच्या शरीरात गर्भ वाढवल्यास आई वा बाळाच्या जीवाला धोका उत्पन्न होणे.
५) IVF उपचार वारंवार फेल होणे.

IVF मध्ये मिळणाऱ्या गर्भांच्या संख्येनुसार प्रेग्नन्सी राहण्याचे प्रमाण ठरते. एकदा दोन गर्भ गर्भाशयात सोडले की गर्भ राहण्याची शक्यता साधारण ४०% असते. असे दोन वेळा करता आले तर गर्भ राहण्याची एकुण शक्यता साधारण ६०% होते. असे तीन वेळा करता आले तर त्या स्त्रीमध्ये गर्भ राहण्याची एकुण शक्यता ८०% होते. गर्भांची संख्या खालील गोष्टींवर ठरते.

१) मिळालेल्या M2 स्रीबीजांची संख्या
२) मिळालेल्या M2 स्रीबीजांचा दर्जा
३) पुरूषबीजांचा दर्जा

IVF मध्ये दोन प्रकारचे खर्च येतात.

अ) फ्रिजिंग पर्यंतचा खर्च
ब) एंब्रीओ ट्रांसफरचा खर्च

अ) फ्रिजिंग पर्यंतचा खर्च —> IVF मध्ये स्त्रीबीजे वाढवण्यापासून गर्भ गोठवून ठेवण्यापर्यंतचे टप्पे ठरलेले असतात. त्यामुळे तोपर्यंतचा खर्चही ठरलेला असतो. स्रीबीज तयार करण्यासाठीपहिले दहा दिवस दिल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शनच्या किमतीतील फरकामुळे त्यात दोन बदल होतात.

१) रिकॉंबिटंट DNA टेक्नॉलॉजी (Recombitant DNA technology) ने तयार केलेले rFSH अतिशय महाग असते. त्यामुळे ही इंजेक्शन वापरून दिलेल्या पॅकेजची किंमत जास्त असते. या इंजेक्शन्सचा परिणाम अतिशय अपेक्षित असतो. त्यामुळे एकुण प्रेग्नन्सी दरात थोडासी वाढ होते. ही रक्कम FSH च्या दहा दिवसाच्या एकुण डोस गरजेनुसार नुसार थोडीफार बदलते.

२) पारंपारीक पद्धतीने तयार केलेले FSH हे rFSH च्या मानाने स्वस्त असते. त्यामुळे ही इंजेक्शन वापरून दिलेल्या पॅकेजची किंमत eFSH पॅकेजपेक्षा कमी असते. या इंजेक्शन्सचा परिणाम बॅचप्रमाणे थोडाफार बदलू शकतो. काही संशोधनानुसार, या पारंपारीक इंजेक्शनचा वापर करून स्त्रीबीज तयार केल्यावर rFSH पेक्षा थोडी कमी बीजे मिळतात आणि एकुण प्रेग्नन्सी दर FSH पेक्षा थोडासा कमी राहतो. ही रक्कम FSH च्या दह दिवसाच्या एकुण डोस गरजेनुसार नुसार थोडीफार बदलते.

ब) एंब्रीओ ट्रांसफरचा खर्च —> गोठवलेले गर्भ पुर्वस्थितीला आणून ते गर्भाशयात सोडण्यासाठी म्हणजे एंब्रीओ ट्रांसफरसाठी प्रत्येक वेळा थॉईंगा मेडिया किट, भ्रुणतज्ञ, IVF स्पेशालिस्ट, कल्चर मेडिया, एंब्रीओ ट्रांसफर कॅथेटर असा खर्च येतो. एका एंब्रीओ ट्रांसफरमध्ये एकत्र गोठवलेले दोन गर्भ गर्भाशयात सोडले जातात.

IVF सायकल मध्ये एकुण किती गर्भ तयार होतात यावर किती वेळा एंब्रीओ ट्रांसफर करता येईल ते ठरते. तसेच कितव्या एंब्रीओ ट्रांसफराला गर्भ राहतो यावर किती वेळा एंब्रीओ ट्रांसफर करावी लागेल हे ठरते. कुणाला पहिल्या एंब्रीओ ट्रांसफरलाच गर्भ राहतो तर कुणाला तिसऱ्या एंब्रीओ ट्रांसफरला गर्भ राहतो. त्यामुळे एंब्रीओ ट्रांसफरचा एकुण खर्च नक्की किती येईल हे सांगणे तसे कठीण असते.

वंधत्व उपचारांदरम्यान आपण आर्थिकदृष्ट्या फसवले जात असल्याची भावना पेशंटच्या मनात येता कामा नये याची पुर्ण काळजी सिटी फर्टीलिटी सेंटर मध्ये पहिल्या दिवसापासुन घेते आहे. तो आमचा धोरणत्मक निर्णय आहे. त्यासाठी उपचार खर्चाबाबत आम्ही कमालीची पारदर्शकता बाळगतो. IVF ची प्रोसेस सुरू करायच्या आधीच सर्व प्रकारच्या खर्चांचा अंदाज दिला जातो. नंतर कुठलेही छुपे खर्च करायला सांगितले जात नाही.

१) ओव्हारीयन हापर स्टिम्युलाशन सिंड्रोम (OHSS – Ovarian Hyperstimulation Syndrome) ——>

काही स्त्रियांची बीजांडे बीजे तयार करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या FSH च्या इंजेक्शनला खुपच संवेदनशील असतात. त्यांच्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त स्त्रीबीजे वाढू लागतात. या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषण पोहजवण्यासाठी बीजांडांचा रक्तपुरवठा खुप जास्त प्रमाणात वाढतो. या रक्ताच्या प्रेशरमुळे बीजांडातून पोटात पाण्याचा स्राव सुरू होतो. हा त्रास सुरू झालेला असेल तर ट्रिगरच्या इंजेक्शननंतर हा त्रास एकदम वाढतो. त्याच महिन्यात प्रेग्नन्सी राहिली तर हा त्रास अजून वाढतो. बहुतेक वेळा हा त्रास अगदीच सौम्य स्वरूपाचा असतो आणि त्यावर केवळ सोनोग्राफीने लक्ष ठेवावे लागते. कधीकधी या त्रासासाठी औषध-गोळ्या आणि काही इंजेक्शन्स द्यावे लागतात. अगदीच क्वचित प्रसंगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करावे लागते.

पुर्वी IVF साठी ‘अगोनिस्ट प्रोटोकॉल’ सर्रास वापरला जाई. त्या वेळी OHSS चे पेशंट कधी कधी पहायला मिळत. पण सध्या आम्ही वापरत असलेल्या ‘अँटागॉनिस्ट प्रोटोकॉल’ मुळे OHSS पेशंट अगदीच विरळा दिसतो. या नवीन प्रोटोकॉलमुळे आजकाल जे थोडेफार OHSS चे पेशंट दिसतात ते अगदी सौम्य प्रकारातील असतात. अशा प्रकारे सध्या OHSS चा धोका पुर्वीप्रमाणे काळजी करण्याजोगा अजिबात राहिला नाही.

२) ओव्हम पिक अप (Ovum Pick Up ) —>

स्त्रीबीजे बाहेर काढून घेण्याच्या प्रक्रियेसाठी शिरेतून भुल द्यावी लागते. सध्या भुलशास्त्र अतिशय प्रगत झालेले असल्याने भुलीचा धोका अगदीच कमी झालेला आहे.स्त्रीबीजे काढण्यासाठी वापरण्यात येणारी लांब सुई अतिशय पातळ असते. त्यामुळे शरीराला फारसी इजा होत नाही. त्यामुळे ऑपरेशननंतर भुल उतरल्यावर फारसे दुखत नाही. पेशंट चार तासात आपली सर्व कामे पुर्वव्रत करू शकतात.अगदी क्वचित प्रसंगी स्रीबीजे काढण्यासाठी वापरण्यात येणारी लांब सुईने इजा होऊन थोडाफार रक्तस्राव होऊ शकतो.

३) एंब्रीओ ट्रांसफर —>

गर्भ गर्भाशयात सोडण्यासाठी कुठलीही भुल वगैरे आवश्यक नसते. स्त्रीजनन इंद्रियांची आतून तपासणी करताना जो थोडा त्रास जाणवतो तितकाच काय तो त्रास यात होतो. त्यानंतर दोन तासात पेशंट आपली सर्व कामे परत करू शकते.

४) दुरोगामी परिणाम —>

वारंवार IVF केल्याशिवाय IVF चे फारसे दुरोगामी परिणाम होत नाहीत.

IVF मध्ये दोनपेक्षा जास्त गर्भ गर्भाशयात सोडले तर दोन, तीन किंवा त्यापेक्षाही जास्त गर्भ एकाच वेळी मुळ धरतात. पण मानवी गर्भाशय केवळ एक गर्भ वाढवण्यासाठी तयार केले गेले आहे. गर्भाशयात एकापेक्षा जास्त बाळे वाढत असताना खुप जास्त काळजी घ्यावी लागते. तरी सुद्धा अनेक स्त्रियांमध्ये वेळे आधी प्रसुती होते. पुर्ण वाढ न झालेल्या बाळांना सध्याचे प्रगत अतिदक्षता विभाग जगवतात. आशा वेळेआधी जन्म झालेल्या बाळांमध्ये थोडे फार दुरोगामी दुष्परिणाम होऊ शकतात. बाळावर होणारे असे दुष्परिणाम IVF मुळे नसून कमी वयाचे वा वजनाचे बाळ जन्माला आल्यामुळे होते. IVF मध्ये साधारण १०% बाळे वेळेआधी जन्माला येतात. याच संशोधनात नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्ये वेळेआधी प्रसुतीचे प्रमाण ५.५% असल्याचे आढळले आहे. याचाच दुसरा अर्थ असा होतो की ९०% IVF प्रेग्नन्सी आणि ९५% नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्येश बाळे पुर्ण दिवस भरून प्रसुत होतात.

पुरेसा आराम आणि प्रेग्नन्सीतीला इतर काळजी काटेकोरपणे घेतल्यास IVF ची बहुतेक बाळे पुर्ण दिवस भरून प्रसुत होतात.

IVF मध्ये सहाव्या दिवशी गर्भ गर्भाशयात सोडला जातो. पहिल्या पाच दिवसात गर्भामध्ये अवयव निर्मिती सुरू झालेली नसते. या पाच दिवसात केवळ गर्भाला पोषण देणाऱ्या पेशी मुख्य गर्भपेशींच्या गोळ्यापासून वेगळ्या होऊन वार तयार करायच्या कामाला लागलेल्या असतात. IVF मध्ये शरीराच्या बाहेरच्या गर्भाच्या या पाच दिवसात इतर 

कुठल्याही अवयवाची निर्मिती सुरू झालेली नसल्याने बाळात दोष निर्माण होण्याचे प्रमाण नैसर्गिक गर्भधारणेइतकेच असते. नैसर्गिक गर्भधारणेत बाळांमध्ये जन्मजात दोष असण्याचे प्रमाण साधारण ३% असते. IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या बाळांमध्ये हे प्रमाण साधारण ४% पाहिले गेले आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की नैसर्गिक गर्भधारणा झालेली साधारण ९७% बाळे आणि IVF द्वारे गर्भधारणा झालेली ९६% बाळे नॉर्मल असतात.

IVF procedures
0 +
Surgeries
0 +
Deliveries
0 +

Our Services

We provide comprehensive care for women of all ages. Right form the reproductive issues to post-menopausal gynecologic problems, every treatment related to female reproductive organs are provided here.

Contact Detail

Address

Survey No 28, Patil Hospital, Sinhagad Road, Anand Nagar, Pune, Maharashtra 411051

Phone

+91 86699 93336

Subscribe To Our Channel

What People Say
About Us

Pallavi M

We got this reference through one of my friend, with full faith we visited the clinic for consultation. We had already taken consultation and treatment from many renowned gynecologist in Pune. Dr. Gopalkrishna Gawade Sir made us feel confident and comfortable in the first visit itself. He explained us the procedure and line of treatment.

Pooja Singh

I am very excited to writing this review. I was suffering from infertility from last 4 years .in this period I consulted so many Doctors but didn't get any result I was very disturbed .after search I met Dr. Gawde he made me relax and suggested some life changes modifications like yoga , suryanamaskar and prescribe some medicine. And after 6 month I got my test +very. Thanks to Dr. Gawade and Dr.Deepali.

Chaitrali Kulkarni

My experience of Hysterectomy by Dr Gawade was wonderful along with post operative care and his communication skills are also good. I am happy and satisfied with pre operative consultation and Surgical technique.

FAQ

It is the procedure of choice for those with fallopian tube issues, as well as for such conditions as endometriosis, male factor infertility and unexplained infertility.

Success rates strongly depend on the age of the patient, their condition, medical history and the treatment used. We have above 75% of success rate. With accurate diagnostics and holistic approach to relieve stress can increase the chances beyond 80%.

No. The procedure is not painful as it is done under light sedation, but may cause mild discomfort. At our clinic, we use mild anesthesia administered through an IV route which relieves discomfort.

There is no evidence that travel impacts IVF pregnancy rates.

Women have a 10 to 20 percent chance of getting pregnant with each IUI cycle. The more cycles you go through, the better your chances become.

Intracytoplasmic sperm injection (ICSI) is a technique used during in vitro fertilization (IVF) where a single sperm is injected directly into the egg for the purpose of fertilization.

Ideal candidates for ICSI include men with severe infertility issues, including a low sperm count. Other candidates include men who have sperm motility issues, problems with sperm development, or a blockage that prevents sperm from being ejaculated.

Yes, alcohol can lead to infertility in both men & women.

Laparoscopy still has an important role in the diagnosis and treatment of infertility. A significant number of infertile women, such as those with a tubal factor, PCOS, and women with unexplained infertility can benefit from it.

Most women go home 2-3 days after this surgery, but complete recovery takes from six to eight weeks.

Book Appointment with
Dr. Gopalkrishna Gawade

IVF specialist & Laparoscopic gynecologist

“More than half of all infertility cases are caused by stress. Here’s how to find peace in your life. Smile. Relax. Fall in love with yourself again, because you deserve it. Let us help you through this beautiful journey to attain parenthood.